दलित-ओबीसींविरोधात उच्चजातीय भाकडकथा आणी वास्तवता
(भाग 1)
लेखकः- प्रा. श्रावण देवरे, मोबाईलः 75 88 07 2832
………………………
1) या लेखाची pdf फाईल मिळविण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा-
https://drive.google.com/file/d/1VeOncP1mPms8WIFRpm-QpSfYwL9sxuCz/view?usp=drive_link
2) Veb Link: https://shrawandeore.com/?p=484
……………………………………
(भाग 1)
तात्यासाहेब महात्मा फुले यांनी ‘महार’ शब्दाची फोड करतांना सांगीतले की आर्यभटांच्या क्रूर आक्रमणाच्या विरोधात ज्या लोकांनी सर्वात जास्त निकराचा लढा दिला त्या लोकांना आर्यांनी ‘महा-अरि’ म्हणून कुत्सितपणे घोषित केले. महा-अरि म्हणजे मोठा शत्रू ! याच महा-अरि शब्दातून पुढे महार हे जातीवाचक नामकरण झाले. तात्यासाहेबांनी केलेली महार शब्दाची ही व्याख्या महार सैनिकांनी भिमा-कोरेगाव लढाईत पुन्हा एकदा खरी करून दाखविली आणी आर्यभट पेशव्यांना नाक घासत शरणागती पत्करावी लागली. जातीव्यवस्थेच्या निर्मितीच्या प्रक्रियेत व जातीव्यवस्थेच्या विकासाच्या कालखंडात महार जातीविषयक ज्या भाकडकथा पसरविण्यात आल्या असतील त्यांची आज कुठेही फारशी स्पष्टपणे नोंद नाही, मात्र त्या भाकडकथांचा परिणाम आजही डोळ्यांसमोर स्पष्टपणे दिसत आहे. लढवय्या महार जातीला गावकुसाबाहेर फेकणे व अस्पृश्य म्हणून पिढ्यांपिढ्या वागवणे हे वास्तव अस्तित्वात येण्यामागे या भाकडकथाच कारणीभूत आहेत हे कुणीही नाकारू शकत नाही.
एखाद्या समाजघटकाला गावकुसाबाहेर फेकणे व अस्पृश्य म्हणून पिढ्यानपिढ्या वागवणे हे एका रात्रीतून वा एका दिवसात घडू शकत नाही. गावकुसाबाहेर फेकण्यासाठी त्या समाजघटकाची अर्थव्यवस्था दारिद्र्य रेषेखाली आणणे हे काही दिवसात घडवून आणता येउ शकते. आजही गावकुसात राहणार्या काही (सवर्ण?) व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली आल्यात की त्या आपोआप गावकुसाबाहेरील गावठाणमध्ये वसवलेल्या ‘इंदिरा नगर’ मध्ये स्थलांतरीत होतात. आर्थिक-भौतिक परिवर्तनामुळे भारतात गावोगावी अशी ‘इंदिरा नगरे’ सर्वदूर वसलेली दिसतील. मुंबईसारख्या महानगरातही दक्षिण व मध्य मुंबईत राहणारा मध्यमवर्गीय व उच्च-मध्यमवर्गीय मराठी माणुस मुंबईबाहेरील उपनगरात फेकला गेला. हे स्थलांतर स्वेच्छेने होत असल्याचे दिसत असले तरी, त्यामागे उच्चजातीय-उच्चवर्गीय राज्यकर्त्यांची आर्थिक-राजकीय धोरणेच कारणीभूत असतात आणी ही धोरणे षडयंत्रांचा एक भाग असतात. आर्थिक-भौगोलिक (भौतिक) परिवर्तने हा काही दिवसांचा खेळ असतो. परंतू, जातीव्यवस्थेच्या निर्मितीच्या व जातीव्यवस्थेच्या विकासाच्या काळात अशा गावकुसाबाहेर निर्माण झालेल्या तत्कालीन ‘इंदिरा नगरात’ राहणार्या महारांसारख्या लढाऊ समाजघटकास पिढ्यान्पिढ्या अस्पृश्य म्हणून वागवणे हा काही दिवसांचा खेळ असू शकत नाही.
आर्थिक-भौतिक परिवर्तनासोबतच मानसिक परिवर्तन हा सांस्कृतिक परिवर्तनाशी संबंधित असलेला भाग प्रदिर्घ कालावधीतला नियोजनबद्ध व शिस्तबद्ध कार्यक्रम होता. उदाहरणार्थः उच्चजातीय शासन-प्रसाशनतर्फे एखाद्या समाजघटकाची आर्थिक कोंडी केल्यामुळे अति-दारिद्र्य वाट्याला येणे, अति दारिद्यामुळे गाकुसातील घर विकावे लागणे, गावकुसाबाहेरील गावठाणमध्ये वस्ती करावी लागणे, अति-दारिद्र्यामुळे मेलेल्या जनावरांचे मांस खावे लागणे, फाटके कपडे घालावे लागने, अर्धनग्न राहावे लागणे, दारिद्र्यामुळे मिळतील ती अतिश्रमाची व हीन दर्ज्याची कामे करावी लागणे, सतत श्रमाची कामे व साफसफाईची कामे करावी लागत असल्याने स्वतःच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष्य होणे, गलिच्छ राहणीमान व गलिच्छ आहार यामुळे या समाजघटकास स्पर्श न करण्याची मानसिकता गावकुसातील लोकांच्या मनात निर्माण होत गेली. ती महारांसकट सगळ्यांच्याच ‘अंगवळणी’ पडल्यानंतर या समाजघटकांबद्दल हिन भावना निर्माण करणार्या भाकडकथा रचण्यात आल्यात. उदाहरणार्थः गलिच्छ महाराने मंदिर बाटवले, मेलेल्या जनावरांचे मांस खाणार्याने देव बाटवला, देव कोपला, आता गावावर फार मोठे संकट येईल, दुष्काळ पडेल, हाःहाः कार माजेल वगैरे अफवांच्या भाकडकथा तयार करण्यात आल्यात! त्यातून स्पर्श-बंदी मंदीर-बंदी, सावली-बंदी, रोटी-बंदी आदि प्रकारातून त्यांची चहु बाजूंनी आर्थिक, सामाजिक, मानसिक कोंडी करण्यात आली. ही कोंडी मजबुत करण्यासाठी भाकड-परंपरा निर्माण करण्यात आल्यात व सर्वात शेवटी हे सर्व ‘मनुस्मृती’ नावाच्या संविधानात अधिकृतपणे कायद्यात रूपांतरित करण्यात आले.
ही आहे लढवैय्या अस्पृश्यांच्या अधोगतीची सत्यकथा! आता आपण ओबीसींबाबतच्या अधोगतीचा लेखा-जोखा पाहु या!
वर्णव्यवस्थेच्या अंताच्या काळात म्हणजे बौद्ध क्रांतीच्या काळात त्रैवर्ण्यिक गणदासप्रथाक समाजव्यवस्था व चातुर्वर्ण्यक पुरूषसत्ताक शुद्रप्रथाक गणसमाजव्यवस्था नष्ट झाली. दासप्रथा व शूद्रप्रथा नष्ट झाल्यामुळे लाखोंच्या संख्येने दास्यातून मुक्त झालेले शूद्र व गुलाम शेती व शेतीसाठी लागणारी अवजारे बनविण्याची कामे करू लागलेत. शूद्रत्वातुन व गुलामगिरीतून मुक्त झालेल्या दासांना स्वातंत्र्याची मोकळी व स्वच्छ हवा लागल्यामुळे त्यांच्या शरीरात एक नवी उच्चदर्ज्याची उर्जा भरली गेली. शारिरक श्रमाची क्षमता व उत्साह दसपटीने वाढला. सुप्रसिद्ध इतिहासतज्ञ दा. ध. कोसंबी सांगतात की गुलामगिरीतून मुक्त झालेले हे श्रमिक पहिल्यापेक्षा दसपटीने जास्त उत्पादन करू लागले होते. त्यातून पुग व श्रेणीची आर्थिक-व्यावसायिक भरभराटीची नवी समतावादी समाजव्यवस्था जन्मास आली. श्रेणी या समाजघटकात एकच व्यवसाय करणारे विविध स्तरावरील समाजघटक संघटित झालेले होते. तर पूग या समाजघटकात विविध व्यवसाय करणारे व्यापारी एकत्रितपणे राहणारे समाजघटक होते. त्यांच्यात आपसात होणारी भांडणे मिटविण्यासाठी पूग व श्रेणींची स्वतंत्र न्यायालये होती व राजा या न्यायालयांच्या न्यायदानात कुठेही हस्तक्षेप करू शकत नव्हता. दसपटीने जास्त उत्पादित होणार्या या घाउक वस्तूंनी देशातील बाजापेठांसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठाही काबीज केल्या होत्या.
पुर्वेकडून पश्चिमेकडे गेलेल्या या जागतिकीकरनाने भारतखंडाला भरभराटीच्या व श्रीमंतीच्या शिखरावर नेले होते. बौद्ध सम्राट महानंद राजाच्या संपतीच्या कथा दंतकथा बनल्या होत्या व त्याची नाणी चंद्रगुप्ताच्या नाण्यांपेक्षा श्रेष्ठ दर्ज्याची व अधिक मुल्यवान होती, असे कोसंबी सांगतात. नवी क्रांतीकारक समाजव्यवस्था जन्मास घालणारा हा पुरोगामी समाजघटक मुख्यतः कष्टकरी उत्पादक व सेवाकर्मी समाजघटक होता जो त्याकाळी पूग व श्रेणी या दोन सन्माननीय नावाखाली संघटित झालेला होता. त्यांच्यात शेतीकाम, सुतारकाम, लोहारकाम, कुंभारकाम, केस-कर्तनकाम, चांभारकाम, गाव-काम, व्यापारकाम, कच्या-पक्क्या मालाची वाहतुक करण्याचे लमाण-काम, दगडाचे पाथरवट-काम, तांब्या-पितळाचे तांबटकाम, रंगारीकाम, मेंढपाळ-काम, भाजीपाल्याचे व फुला-फळांचे माळी-काम, सोन्याचे सुवर्णकाम, धोबीकाम, आदि सेवाकर्मी व उत्पादककर्मी समाजघटक समाविष्ट होते. ही कामे करणार्या समाजघटकास त्या काळी श्रेष्ठी (अति-प्रतिष्ठीत) मानले जात होते. या कष्टकरी समाजाचे नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात ‘ओबीसी’ या नावाने केले. तत्कालीन ओबीसींनी बौद्ध क्रांतीचा आर्थिक समतावादी कणा इतका मजबूत केला की, ज्यामुळे बौद्ध धम्म आशियाखंडात पसरला व जागतिक बाजारपेठांवर राज्य करू लागला.
मोठ-मोठे बौद्ध विहार व बौद्ध-जैन लेण्या निर्माण करण्याचे काम या पुग व श्रेणींतील तत्कालीन श्रेष्ठी ओबीसींनी केले. ही विहारे व लेण्या शिक्षणासाठी विद्यापीठ, व्यापारी माल साठविण्यासाठी गोदाम, आर्थिक व्यवहारासाठी बँका, व्यापारींची विश्राम स्थळे व भिक्खु संघासाठी निवास-स्थाने आदि अनेक उद्देशाने निर्माण करण्यात आलेली होती. जागतिक व्यापारी मार्गांवर ही विहारे व लेण्या निर्माण करण्यात आल्या होत्या. या लेण्यांच्या दगडांवर आजही देणगीदारांची नावे कोरलेली दिसतात. हे सर्व दानशूर कोण होते? अर्थातच उत्पादक-श्रेण्या व व्यापारी-पुग ज्यांना आज ‘‘ओबीसी’’ नावाने ओळखले जाते. बौद्ध धम्म केवळ धार्मिक क्रांती म्हणून मर्यादित राहीला असता तर बौद्ध विहारात ‘धम्मम सरणम गच्छामी’ रटता-रटता तो ब्राह्मणी-वैदिक धर्माला कधी शरण गेला ते कोणाला कळालेही नसते. इतर धर्मांप्रमाणेच बौद्ध धम्मही लगेच ब्राह्मणवादाला समर्पित झाला असता. परंतू, तत्कालीन ओबीसी समाजघटकाने या बौद्ध धम्म-क्रांतीचा आर्थिक व सांस्कृतिक कणा मोठ्याप्रमाणात मजबूत केल्यामुळे धम्माला राजाश्रय मिळत गेला. बौद्ध धम्म राजकिय सत्तेचा अधिकृत धर्म बनल्यामुळे ब्राह्मणवाद लाचार बनला व तो उलट्या पावलाने बौद्धवादास शरण आला.
(टीप- हा मुद्दा अधिक विस्ताराने समजून घेण्यासाठी प्रा. श्रावण देवरे यांचे इतर लेख वाचा! लेखांच्या लिंक्स संदर्भ यादीत दिलेल्या आहेत.)
आता आपण लेखाच्या पुढील भागात बौद्ध धम्म-क्रांतीचा मुख्य कणा असलेल्या श्रेष्ठी ओबीसींचे अधःपतन करण्यासाठी कोणती षडयंत्रे व कोणत्या भाकड-कथा रचण्यात आल्यात व त्या सर्वसमाजघटकांनी का व कशा स्वीकारल्यात त्याची चर्चा करू या! तोपर्यंत जयजोती, जयभीम, जय पेरियार!!
लेखकः
प्रा. श्रावण देवरे
ओबीसी राजकीय आघाडी
Email: s.deore2012@gmail.com
संदर्भः
1) संदर्भः ‘Peoples Post’, पाक्षिक, 1-15Nov2023 Article बिहार जात-जनगणना लेख, पान- 16 ते 20
https://acrobat.adobe.com/id/urn:aaid:sc:AP:183ec38c-3d41-401a-8fe7-0096b25e31f1
2) पाक्षिकातील या लेखाची pdf कॉपी पुढीलप्रमाणे Link:
https://drive.google.com/file/d/1FhoDNnJB8SgPL5AXH6YR7_Fe0NRPW1OO/view?usp=drive_link
3) प्रा. श्रावण देवरे यांची ‘साप्ताहिक रयत’ ने घेतलेली मुलाखत भाग-3 ची लिंक पुढीलप्रमाणे- ‘‘जात-निर्मिती व जातीअंत’’
https://drive.google.com/file/d/1PqkVyzOxloVIAW1E0YOz9cSnhs-jNEwn/view?usp=drive_link
4) प्रा. श्रावण देवरे यांची ‘साप्ताहिक रयत’ ने घेतलेली मुलाखत भाग-4 ची लिंक पुढीलप्रमाणे- ‘‘जात-निर्मिती व जातीअंत’’
https://drive.google.com/file/d/1erJyoLSnUxCWdGmMLpU0xf9GNTuwCwNV/view?usp=drive_link
5) हा लेख दैनिक ‘‘बहुजन सौरभ’’ च्या 22 ऑक्टोंबर 2026 च्या अंकात प्रकाशित झाला आहे.

